उरुळी कांचनजवळ टेम्पो कार आणि दुचाकीचा तिहेरी अपघात
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद, वाहनांचे प्रचंड नुकसान, चालकाचे नियंत्रण सुटले आणि...
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुणे सोलापूर महामार्गावरील खेडेकर मळा परिसरात तिहेरी अपघात झाला आहे. आयशर टेम्पो, कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात २ जण गंभीर जखमी झाले असून ७ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
आयशर टेम्पो हा पुण्याकडे निघाला होता. तर एक कार सोलापूरच्या दिशेने निघाली होती. या टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. पण अचानक टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले ठणि तो थेट सोलापूरकडे निघालेल्या कारवर जाऊन आदळला. यावेळी या टेम्पोने शेजारुन निघालेल्या एका दुचाकीलाही धडक दिली. यावेळी गाडीत असलेल्या पती -पत्नी व त्यांच्या दोन मुलांना किरकोळ मार लागला आहे तर टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील व्यक्तीही जखमी झाली आहे. तसेच अपघातात वाहनाचे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त व्यक्तींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पुण्यात सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे रहदारी आणि गाडी घरसल्याच्या घटनात वाढ झाली आहे. त्यामुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज आहे. दरम्यान नागरिकांच्या मदतीने पोलीसांनी वाहनांना बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.