पीएसआय परीक्षेत सुरेखा बिडगर मुलींमध्ये राज्यात पहिल्या
पहिल्या अपयशातुन प्रेरणा घेत पटकवला पहिला क्रमांक, खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण, काैतुकाचा वर्षाव, असा होते स्टडी टाईम
नाशिक दि ७ (प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२० च्या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. यात चांदवड तालुक्यातील शिक्षिका सुरेखा बिडगर या राज्यात मुलींमध्ये पहिल्या आल्या आहेत. पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आले होते, मात्र हार न मानता त्यांनी आपले प्रयत्न कायम राखले अखेर यावेळेस सुरेखा या प्रथम आल्या आहेत.
सुरेखा यांचे शिक्षण उसवाड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. उच्च माध्यमिक शिक्षण चांदवडच्या नेमिनाथ शिक्षण संस्थेत तर एफ.वाय.मध्ये असताना २००६ मध्ये प्रशांत शेळके या अभियंत्यासोबत लग्न झाले. एस.वाय.नंतरचे त्यांचे सर्व शिक्षण पतीने पूर्ण केले. २०१३ मध्ये बी.एड. पूर्ण करून सन २०१५ मध्ये शिक्षक म्हणून व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेत नोकरीला प्रारंभ केला. मात्र, त्यांना वर्दीचे आकर्षण स्वस्थ बसू देत नसल्याने राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरवले. पतीसोबत चर्चा केल्यानंतर पतीने सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी यश मिळेपर्यंत मोबाईल न वापरण्याचा संकल्प केला होता. यावेळी त्यांनी सेल्फ स्टडीवर जास्त भर दिला. अखेर आज त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना “पास होणार याची खात्री होती, मात्र मुलींमध्ये राज्यात प्रथम येणार अशी कधीच कल्पनाही केली नव्हती, आनंद होत असल्याची भावना बिडगर यांनी व्यक्त केली आहे. आपल्या यशाचे श्रेय सुरेखा यांनी आपल्या कुटुंबियांना दिले आहे.
सुरेखा बिडगर या धनगर समाजातील आहेत. पण आपणही यशस्वी होऊ शकतो हा संकल्प पूर्ण करत अधिकारी बनून तरुणींसमोर आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे अधिकारी बनल्यानंतर त्यांनी आज मोबाईल हातात घेतला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सोनसळे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्या तरुणींच्या आदर्श आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे.