शिंदे गटातील आमदारांना बायकोही म्हणते फोन आला का?
मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातील आमदार वेटिंगवरच, अर्थ खात्यावरून विस्तार लांबणीवर?
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- भाजपा शिवसेना युती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची मोठी यादी आहे. पण शिंदे फडणवीस सरकारला वर्षपूर्ती होऊन देखील अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यातच शिंदे गट कमालीचा आक्रमक आहे. सत्तेतील राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे काही जणांच्या मंत्रिपदाच्या स्वप्न भंगण्याची शक्यता आहे. याचा धसका शिंदे गटातील आमदारांनी घेतला आहे. सत्तेत तीन पक्ष एकत्र आल्यानंतर यामध्ये कोणत्या पक्षातील कुठल्या नेत्याला मंत्रीपद मिळणार यावरून सध्या वाद रंगला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन आपल्याच सरकारला मिश्किल टोला लगावला आहे. आमदार कडू म्हणाले, मुख्यमंत्री फोन करतात की नाही करत? सर्वजण फोनची वाट पाहत आहेत. बऱ्याच जणांचा यज्ञ सुरू आहे. बायकोही विचारते. काहो फोन येणार आहे का तुम्हाले? मला नाही विचारलं. पण काही आमदारांना त्यांची बायको विचारत असेल. तुमचं काही जमत नाही का? तुम्ही तर लई कष्ट केले ब्वा. लै मेहनत केली. गुवाहाटीला गेले. तिकडे गेले. बदनाम झाले. फोन आला नाही तर कसं कराल? असं आमदारांची बायको त्यांना प्रश्न विचारत आहे असं टोमणा त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरुन लगावला आहे. त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थखातं देणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु अर्थखाते देण्यावरून शिंदे गटाचा विरोध आहे. पण इच्छा नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत. जशी निकालाची आपण वाट पाहतो. तशीच आमदार फोनची वाट पाहत आहेत. प्रत्येकाला वाटतं मंत्री झालो पाहिजे. त्यात गैर काय असा सवाल कडू यांनी उपस्थित केला आहे.
सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्यावर खापर फोडत आम्ही उद्धव ठाकरेंची साथ सोडली, असे शिवसेनेचे आमदार सांगत होते. पण आता राष्ट्रवादीच भाजपसोबत आल्याने पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर मंगळवारी एकमत होऊ शकले नाही. दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाला असून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप लांबणीवर पडल्याची शक्यता आहे.