संभाजी भिडे, बच्चू कडू यांच्यामुळे एकनाथ शिंदे अडचणीत
संभाजी भिडेमुळे एकनाथ शिंदेंची दुहेरी कोंडी, भिडेंबाबत केली मोठी मागणी, काय म्हणाले कडू?
मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- आमदार बच्चू कडू अलीकडे शिंदे सरकारवर जोरदार टिका करताना दिसत आहेत. मंत्रीपदाने दिलेली हुलकावणी, अजित पवार गटाचे सत्तेत सामील होणे यामुळे ते सरकारवर आसूड ओढताना दिसत आहेत. आता संभाजी भिडे यांच्यामुळे ते पुन्हा शिंदे सरकारवर बरसले आहेत. यावादात त्यांनी आता थेट एकनाथ शिंदेना खेचले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा फुले आणि साईबाबा यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, संभाजी भिडे यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. तिरंग्याचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. संभाजी भिडेंना बेड्या ठोकल्या पाहिजेत. हे जर थांबलं तर संभाजी भिडे विरोधात आम्ही रोखठोक भूमिका घेऊ. सहा महिने तरी संभाजी भिडे यांना देशाच्या बाहेर ठेवलं पाहिजे. भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना अटक होणे गरजेचे आहे, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले आहेत. दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिडे गुरुजीवर कारवाई करण्याचे आश्वासन रविवारी दिले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता कडू यांच्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. संभाजी भिडेंविरोधात बोलले तर हिंदुत्ववादी प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता आहे, तर कोणतेही विधान न केल्यास विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अमरावतीच्या बडनेरामध्ये एका कार्यक्रमात बोलताना संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींचे वडील करमचंद नसून एक मुस्लीम जमीनदार होते, असं विधान केले होते. करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले”, असे भिडे म्हणाले होते.