हवालदार महिलेने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
अनैतिक संबधात अडथळा ठरत होता पती, प्रियकर देखील सीआरपीएफमध्ये, असा रचला हत्येचा कट
भरतपूर दि १३(प्रतिनिधी)- राजस्थानच्या भरतपूरमध्ये पत्नीनेच आपल्या पतीचा खुन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने हे हत्याकांड करण्यात आले. पत्नी सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आहे, तर तिचा प्रियकर देखील सीआरपीएफमध्ये आहे.
संजय जाट असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे, तर पूनम संजय जाट असे हत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे.तिचा प्रियकर रामप्रताप गुर्जर याने तिला या हत्येत मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार मुळचा राजस्थानमधील असलेला संजय जाट हा पत्नी पूनम जाट हिच्यासह सध्या दिल्लीमध्ये राहत होता. त्याची पत्नी सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदावर तैनात होती. पूनमचे अडीच वर्षापासून अलवर येथील रामप्रताप गुर्जर याच्याशी प्रेमसंबंध होते. रामप्रतापही सीआरपीएफमध्ये असून तो नागालँडमध्ये असतो. पती मारहाण करतो असं सांगून पूनमने राम प्रतापला दिल्लीत बोलावून घेत पतीच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी दोघांनी संजयला दिल्लीत बोलावून घेतले. नंतर त्याला गाडीत बसवून त्याची गळा आवळून हत्या केली. यानंतर पूनम दिल्लीत थांबली आणि तिने रामप्रतापला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पाठवले. रामप्रताप मृतदेह घेऊन बनसूर येथे पोहोचला आणि तिथल्या रिकाम्या प्लॉटमध्ये तिच्या पतीचा मृतदेह पुरला. ही घटना ३१ जुलैला घडली. बरेच दिवस संजय सोबत संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी दिल्लीत असलेल्या त्याने पूनमला फोन करून पतीबद्दल विचारले असता तिने उत्तर न दिल्याने नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यांना संजयची पत्नी पूनम हिच्यावर संशय आला. कारण ती सतत उडवाउडवीची उत्तरे देत होती.अखेर पोलिसांनी रामप्रताप आणि पूनम यांची कोठडीत चौकशी केली असता, दोघांनी संजयची हत्या करून मृतदेह पुरल्याची कबुली दिली. अता राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला प्रियकरासह अटक केली आहे.