…. म्हणून भाजपाने देशद्रोहाचा कायदा रद्द केला
पहा कोणी केली भाजपावर टिका, तथाकथित विश्वगुरु नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटल्याचा दावा
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- २०१४ पासून देशातील राजकीय चित्र बदलले असून दबावाचे, दडपशाहीचे राजकारण सुरु झाले आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याचा आवाज बंद केला जातो. देशात जुलमी ब्रिटीशांप्रमाणे राज्यकारभार सुरु असून आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र बदलण्याची गरज आहे. मोदींचा अहंकार लोकशाहीला घातक आहे, हे अहंकारी सरकार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यासाठी स्वातंत्र्य चळवळीप्रमाणे जात- धर्म विसरून एकत्रित लढा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रागतिक तसेच पुरोगामी विचारांच्या संस्था व पक्ष यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नाना पटोले बोलत होते. या बैठकीला अनेक मान्यवर हजर होते. यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अहंकार भरलेला आहे, संसदेत अविश्वास ठरावावर बोलताना राहुल गांधी यांनीही या अहंकाराची देशाला होत असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली. नरेंद्र मोदी स्वतःला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठे समजू लागले आहेत. हा अहंकार लोकांना आवडत नाही, मोदींच्या लोकप्रियतेमध्ये दररोज घसरण होत आहे. संसदेत राहुल गांधी यांनी ३४ मिनीटांचे भाषण केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ तासापेक्षा जास्त भाषण केले पण जगभरातील लोकांनी राहुल गांधी यांच्याच भाषणाला जास्त पसंदी दिली, मोदींच्या भाषणकडे जनतेने दुर्लक्ष केले, जनता मोदी सरकारला कंटाळली आहे त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला तर देशात परिवर्तन होण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. स्वातंत्र्य चळवळीत अनेक व्यक्ती, सामाजिक संघटनांनी घरावर तुळसीपत्र ठेवून मोठा संघर्ष केला, त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले, हा त्याग व बलिदान याचा विसर पडता कामा नये. आजही सामाजिक संघटनांची भूमिका महत्वाची आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा पुण्यात आले त्याला काही संघटनांनी विरोध केला त्याचा संदेश देशभरात गेला. आताही आपल्याला या हुकुमशाही शक्तीच्या विरोधात एकत्र येऊन लढायचे आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत
देशातील महत्वाची व गोपनीय माहिती दुश्मन देशाला पुरवणारा व्यक्ती हा देशद्रोहीच आहे. प्रदीप कुरुलकर यानेही अत्यंत गोपनीय माहिती पाकिस्तानला दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे, पण त्याच्यावर अजून देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. प्रदीप कुरुलकर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याचे उघड झाले आहे, त्याला वाचवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकार प्रयत्न करत असून त्याचाच भाग म्हणून देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे, असा दावा केला आहे.