मोदींनी सिलेंडर वाढवून दिले, आम्ही काय माती खायची का?
भाजपाच्या संकल्प यात्रेत महिला बावनकुळेवर संतापली, बावनकुळेंच्या फजितीचा व्हिडिओ जोरदार व्हायरल
वर्धा दि २(प्रतिनिधी)- भाजपाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. यंदा ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प भाजपाने केला आहे. त्यातच भाजपाने संकल्प यात्रा काढत मोदींच्या कामाची माहिती दिली जात आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये जाऊन तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण पाहिजे असा प्रश्न विचारला जात आहे. अशाच यात्रेत वर्धामध्ये बावनकुळे यांनी एका महिलेला असा प्रश्न विचारताच महिलेच्या उत्तराने बावनकुळेंची फजिती झाली आहे.
भाजपकडून राज्यभरात महाविजय २०२४ संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या यात्रेचे नेतृत्व करत आहेत. वर्ध्यातही भाजपाकडून संकल्प ते समर्थन या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यात्रेदरम्यान महिलांना २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे असा सवाल बावनकुळे यांनी केला. त्यावर वर्ध्यातील महिला बावनकुळे यांच्यावर चांगल्याच संतापल्या. यात्रेदरम्यान एका महिलेने महागाईवरून बावनकुळे यांना चांगलेच सुनावले आहे. यात्रेत त्यांनी महिलेला मोदी पंतप्रधान हवेत का? असे विचारल्यावर त्या महिलेने समस्या मांडत बावनकुळे यांना जाब विचारला. सरकार विजेचे बिल वाढवून देतं, सिलेंडर वाढवून देतं, आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का? असा संतप्त सवाल महिलेने विचारला. त्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्या महिलेला तुम्ही स्टेजवर चला,आपण स्टेजवर बोलू अशी विनंती केली. यावर संतापलेल्या महिलेने स्टेजवर बोलायचे तर मग लोकांना रस्त्यावर विचारता कशाला? असा उलट प्रश्न केला. तसेच नाईक का खाली घेतला असा देखील सवाल केला. यामुळे खजील बावनकुळे यांनी तेथून काढता पाय घेतला. महागाई वाढवून ठेवली आहे. सिलिंडरचे भाव वाढवून ठेवले आहेत. गरीब लोकांना लुटणंच चालू आहे. सिलिंडरचे भाव कमी झाले पाहिजेत. विजेचे बिल वाढलेले आहे. दोन दिवस जर बिल भरायला उशीर झाला तर वीज कापतात. असे देखील ही महिला म्हणाली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी या यात्रेच्या निमित्ताने चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग मधील नागरीकांशी संवाद साधला होता. बाजारपेठेतील एका दुकानदाराच्या उत्तराने बावनकुळे यांची पंचाईत झाली होती. बावनकुळे यांनी बाजारपेठेतील लोकांना पंतप्रधान पदी कोण पहायला आवडेल असा प्रश्न विचारला होता. यांच्या या प्रश्नावर एका दुकानदाराने राहुल गांधी असे उत्तर दिले होते. तो देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता.