रांची दि २५ (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्यानंतर शिंदे सरकार सत्तेवर आले.पण आता झारखंडमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे तिथे भाजपा अॅक्शनमध्ये आला आहे.
आयोगानं आपला अहवाल सादर केला असून सोरेन यांची आमदारकी रद्द होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. याची फक्त औपचारिक घोषणा होणं बाकी राहीलं आहे. सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगानं यासंदर्भातील पत्र देखील राज्यपालांना पाठवलं आहे.हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर करत स्वत:च्या भावाच्या कंपन्यांना खाणी लीजवर दिल्याचा आरोप होता त्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.हेमंत सोरेन मुख्यमंत्रीपदासोबतच खनिज मंत्रालयाचीही जबाबदारी पार पाडत होते. ईडीनेही कारवाई करताना पूजा सिंघल यांना अटक केली होती. सोरेन यांच्या उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन अचानक प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत.
सोरेन बिहारमध्ये २५ वर्षांपूर्वी ज्यापद्धतीनं राजद प्रमुख लालू प्रसाद यांनी राबडी देवींना मुख्यमंत्री करुन धक्का दिला होता. त्याचधर्तीवर आता झारखंडमध्येही प्रयोग करतील असे बोलले जात आहे. पण भाजपाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.