
मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात जोरदार टोले लगावत विरोधकांचा समाचार घेतला.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी थेट पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगितला. त्यावेळी अजित पवारांनी घाई केली, असा खोचक टोला लगावताना जयंत पाटलांनाही कोपरखळी मारली.
एकनाथ शिंदे पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत म्हणाले की, “पहाटेचा शपथविधी सुरू होता तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि टीव्ही बघत आहे का विचारलं. मी टीव्ही पाहत होतो आणि अजित पवार शपथ घेत होते. मी म्हटलं हे मागचं कधीचं दाखवत आहेत की काय? त्यावर ते म्हणाले नाही, हे आताचंच आहे. तिथं देवेंद्र फडणवीस देखील दिसले. आमचे प्रमुख म्हटले मी जयंत पाटलांनाही फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत. मी त्यांना म्हटलं जयंत पाटीलही तेथेच आहेत,अनिल पाटील तेथे पाठमोरे होते. मला वाटलं जयंत पाटीलदेखील तेथे आहेत. मात्र, जयंत पाटील तेथे नव्हते. ते असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. ओके झाला असता,” असा टोला शिंदेनी राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना लगावताच सभागृहात हशा पिकला अजित पवार यांनी तर थेट शिंदेना हात जोडत नमस्कारच केला.
शिंदे यावेळी देवेंद्रजींचाही उल्लेख केला. फडणवीसांना म्हणाले पुन्हा येईन, पुन्हा येईन. ते पुन्हा आले, पण मलाही सोबत घेऊन आले. आता आम्ही दोघे दोघे आहोत. आधी फडणवीस एकटे सगळ्या विरोधी पक्षांना पुरून उरायचे. आता आम्ही दोघे आहोत. ‘एक से भले दो’. मनात दुसरं काही आणू नका, हे विधायक कामासाठी आम्ही दोघे असं म्हणत आहे,” अस सांगत सभागृहाचे वातावरण हलकेफुलके केले.