
सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांमुळे शरद पवारांवर निष्ठा असणारे अनेक लोक आज पक्ष सोडून जातायेत. त्याचे उत्तर सुप्रिया सुळेंना द्यावे लागेल.अनेकदा शरद पवारांकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं, परंतु शेवटी ती मुलगी आणि बाहेरचे अशा शब्दात शरद पवार गटाच्या युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन यांनी नाराजी बोलून दाखवली.सोनिया दुहन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मी अजून पक्ष सोडला नाही. अन्य कुठल्याही पक्षात प्रवेश केला नाही. मी कालच्या बैठकीला होते, मग असं पाहायला गेले तर जेव्हा पक्षात फूट पडली, आमदारांच्या बैठकीवेळी सुप्रिया सुळेही तिथे होत्या. मग त्यांनी अजित पवारांचा पक्ष जॉईन केला का? त्यामुळे मी अजून पक्षप्रवेश केला नाही. शरद पवारांना आणि राष्ट्रवादीला सोडलं नाही. परंतु काही गोष्टी मला सर्वांसमोर आणायच्या आहेत.
धीरज शर्मा असो वा अन्य लोक, माझ्यासारखे बरीच वर्ष निष्ठेने शरद पवारांसोबत काम करतायेत. शरद पवारांसाठी काहीही करण्यास तयार असलेले हे लोक अचानक पक्ष सोडण्याचा निर्णय का घेतायेत? अजून कुणाचं सरकार आलं नाही. ४ जूनचा निकाल लागला नाही. मी इतकी वर्ष पक्षात काम केल्यानंतर एक सांगते, आमची पूर्ण निष्ठा शरद पवारांवर आहे. परंतु शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रिया सुळेंचा आदर आहे. मात्र त्या आमच्या नेत्या बनू शकल्या नाहीत. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या आसपासच्या लोकांमुळे आमच्यासारखे लोक ज्यांची शरद पवारांवर निष्ठा आहे ते पक्षाला सोडून चाललेत असं त्यांनी सांगितले.
तसेच मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र मागील अनेक दिवसांपासून पक्षात घुसमट होतेय. सुप्रिया सुळेंच्या आसपासच्या लोकांमुळे, निर्णय घेणाऱ्यांमुळे जे शरद पवारांसोबत २०-२५ वर्षापासून आहेत त्यांना पक्षाबाहेर जाण्यास मजबूर केलं जातंय. आम्हाला पक्ष सोडायचा असता तर निवडणुकीतच आम्ही निर्णय घेतला असता. सुप्रिया सुळे या स्वत:चं नेतृत्व सिद्ध करू शकल्या नाहीत असं सोनिया दुहन यांनी म्हटलं.सुप्रिया सुळेंना याचं उत्तर द्यावे लागेल. इतकी वर्ष निष्ठेने काम करणारे लोक का सोडून जातायेत, याचं विचार मंथन सुप्रिया सुळेंनी करायला हवं. मी भाजपात जाणार नाही. मी पक्ष सोडेन किंवा या विधानांमुळे मला पक्षातून काढलं जाईल पण मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. आम्ही पक्षात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. साहेबांनीही प्रयत्न केलेत. परंतु त्यावर काहीच तोडगा निघाला नाही. आम्ही स्पष्टपणे आमच्या समस्या साहेबांसमोर मांडल्या होत्या. त्यानंतर असं जे घडलं, त्यामुळे आम्ही कितीदा या समस्या साहेबांकडे मांडायच्या, त्यांना द्विधा मनस्थितीत ठेवायचं हा प्रश्न आम्हाला पडला. कारण अखेर ती मुलगी आहे आणि आम्ही बाहरचे असंही सोनिया दुहन यांनी सांगितले.