
मित्रासोबत गप्पा मारत थांबलेल्या एका व्यक्तीला चार जणांच्या टोळक्याने लाकडी बांबूने व दगडाने मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार रविवारी (दि.26) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास धानोरी येथील भरत ढाब्याच्या मागील बाजूस घडला आहे.याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.याबाबत संतोष प्रमोद पातुरकर (वय-32 रा. भैरवनगर, धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन नितीन राजू सरोदे (वय-36 रा. स्मशानभुमी जवळ, धानोरी), राज मुकेश सरोदे (वय-20 रा. भिमनगर, विश्रांतवाडी), गणेश तिवारी (रा. तळेगाव) व एका अल्पवयीन मुलावर आयपीसी 326, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी संतोष व त्यांचा मित्र रवी वाघमारे भरत ढाब्याच्या मागील बाजूस गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी आरोपी नितीन सरोदे त्याठिकाणी आला. त्याने कोणतेही कारण नसताना फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. त्यानंतर सरोदे याने त्याचा पुतण्या राज सरोदे व मित्र गणेश तिवारी यांना बोलावून घेतले. आरोपींनी फिर्यादी यांना लाकडी बांबूने व दगडाने डोक्यात, पायावर, मांडीवर, पाठीवर मारुन गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव व त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. संतोष यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.