नरेंद्र मोदी हे उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत भाजप आणि एनडीएतील मित्र पक्षांचे खासदारही मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एकूण 36 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.त्यात महाराष्ट्रातील भाजपच्या चार मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत. तर शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचीही चर्चा आहे. तसेच अजितदादा गटाला फक्त एक कॅबिनेट मंत्रीपद दिलं जाणर आहे. या मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव चर्चेत होतं. पण तटकरे यांचं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीतून मागे पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पटेल यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांच्याच नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कमोर्तब करण्यात आलं आहे. अजित पवार, सुनील तटकरे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पटेल उद्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी नागरी आणि उड्डाण मंत्री पदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे पक्षाच्या वाट्याला येणारं कॅबिनेट मंत्रीपद नवख्या व्यक्तीकडे देण्याऐवजी अनुभवी व्यक्तीकडे देण्याचा बैठकीचा कल होता. त्यामुळेच पटेल यांना मंत्री करण्याचा निर्णय झाल्याचं सांगितलं जातं. पटेल यांना नागरी उड्डाण मंत्रीपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. मात्र, त्याला कुणीही अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रीपदासाठी चार नावे चर्चेत आहेत. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, प्रतापराव जाधव आणि धैर्यशील माने यांची नावे शिंदे गटातून चर्चेत आहे. मात्र, एकच कॅबिनेट मंत्रीपद असल्याने पद कुणाला द्यायचं याचं टेन्शन मुख्यमंत्र्यांना आल्याचं सांगण्यात येतं. मेरिटवरच निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मेरिट नुसार श्रीकांत शिंदे यांची संसदीय गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रीपदासाठीही हाच निकष लागू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. शिंदे यांच्याकडे मंत्रीपद आल्यास ठाणे जिल्ह्याला दुसऱ्यांदा मंत्रीपद मिळणार आहे.