‘मंत्र्याच्या स्वागताला काही नागरिकांसह रिकाम्या खुर्च्यांची गर्दी’
'या' मंत्र्यांच्या सभेतील 'तो' व्हीडिओ ट्विट करत शिवसेनेची टिका
पैठण दि २७ (प्रतिनिधी) – शिवसेनेत बंडखोरी करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री संदिपान भुमरे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात गेले होते. यावेळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण मंत्री भुमरे यांचे स्वागत रिकाम्या खुर्च्यांनी केले आहे. शिवसैनिकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे.
संदिपान भुमरे नवीन सरकारमध्येही मंत्री झाल्याने कार्यक्रमाला अफाट गर्दी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र एकदम उलट चित्र पाहायला मिळालं. कार्यक्रमाला मोजकेच जण उपास्थित होते, त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. विशेष म्हणजे सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरु होणार होता, तो संध्याकाळी चार वाजता सुरु झाला. शेवटी चार वाजताच्या सुमारास भुमरे कार्यक्रम स्थळी पोहोचले. मोजक्याच लोकांच्या समोर त्यांनी भाषण केले. कार्यक्रम स्थळी अनेक खुर्च्या रिकाम्याच असल्याचे पाहायला मिळाले.शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त पैठण शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नवीन सरकार स्थापनेनंतर मंत्री संदिपान भुमरे हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमाच्या निमित्ताने पैठण येथे येणार होते. त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रिकाम्या खुर्चीचा व्हिडिओ ट्विट करत ‘सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी ‘देश भ्रमंती’ करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती!’ अशा शब्दात समाचार घेतला आहे.
सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई अशी 'देश भ्रमंती' करून राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे @SandipanBhumare आज पहिल्यांदाच आपल्या पैठण मतदारसंघात प्रगटले. त्यांच्या स्वागताला पैठण मधील काही नागरिकांसह खूप रिकाम्या खुर्च्यांची देखील उपस्थिती होती!#गद्दार pic.twitter.com/FFIITFcpb2
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 27, 2022
ओैरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाचही बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शक्तीप्रदर्शन केले होते. त्यावेळी मंत्री भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात ठाकरे यांनी रॅली काढली होती. त्यावेळी ठाकरेंच्या रॅलीला प्रचंड गर्दी झाल्याचे पाहायला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर भुमरेंच्या सभेकडे शिवसैनिकांनी फिरवलेली पाठ त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरली आहे.