
उद्धव ठाकरेंच्या ‘या’ खेळीने एकनाथ शिंदेंची दांडी गुल
'यामुळे' शिंदेना शिवसेनेवर दावाच सांगता येणार नाही
मुंबई दि २८ (प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. शिंदे यांनी पक्षावरच दावा केल्यामुळे शिवसेनेचा किल्ला आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा बांधायला सुरुवात केली आहे. पक्ष आपल्याकडेच ठेवण्यासाठी ठाकरेंना पक्षाची कार्यकारीणी भक्कम ठेवावी लागणार आहे. त्यामुळे या एकनाथ शिंदे यांच्यानंतरही ठाकरेंशी एकनिष्ठ राहणाऱ्या शिवसैनिकांना त्यांच्या निष्ठेचे फळ देण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना बढती देण्यात आली आहे. तर शिवसेनेचे जेष्ठ नेते लीलाधर डाके यांचा मुलगा पराग टाके यांच्या मुलावर उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. शिंदे यांना शिवसेना पक्ष ताब्यात घेण्यासाठी पक्षात कशाप्रकारे उभी फूट पडली आहे, हे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकारिणीतील नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे पाठबळ असणे आवश्यक आहे. त्यासाठीच एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि मनोहर जोशी यांची भेट घेतली होती. हा धोका वेळीच ओळखून उद्धव ठाकरे यांच्याकडून निष्ठावंतांच्या निष्ठेचे फळ देण्यात येत आहे.
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटाचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणामुळे अनेक कायदेशीर आणि घटनात्मक पेच निर्माण झाले आहेत. पण ठाकरेंच्या कार्यकारीणीतले सदस्य निष्ठावंत असल्याने शिंदेना पक्षात फूट पडल्याचे दाखवणे अवघड जाणार आहे. ठाकरे यांच्या निष्ठावंतांमुळे शिंदेंची मात्र कोंडी होणार आहे.