कल्याणीनगर येथे पोर्शे कार अपघातानंतर शहरात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येरवडा परिसरातील कल्याणी नगर भागात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कारने शाळेत जाणाऱ्या एका 15 वर्षाच्या मुलाला जोरात धडक दिली. यामध्ये मुलाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळक यांनी दिली.शाश्वत राम बोगाडे (वय 15 राहणार – कुमार कृती सोसायटी, कल्याण नगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कार चालक रविकांत रामदिन गौर (वय -37 राहणार – रोहन निगम अपार्टमेंट, विमाननगर) याला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (दि.20) सकाळी साडे आठच्या सुमारास कल्याणी नगर येथील मेरी गोल्ड सोसायटी समोर घडली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी प्राप्त झालेल्या प्रमाणे सह्याद्री हॉस्पिटल, येरवडा येथे जाऊन माहिती घेतली असता, आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याणी नगर येथील मेरी गोल्ड सोसायटी समोरून शाश्वत बोगाडे सायकलवरुन शाळेत जात होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात हुंडाई (MH 12 UC 8029) कारने शाश्वत याच्या सायकलला जोरात धडक दिली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी कार चालक रविकांत गौर याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक लामखडे यांच्यासह वैद्यकीय तपासणी करिता पाठवून तपासणी करण्यात आलेली आहे. आरोपी चालकाने मद्यप्राशन केलेले नाही, असा अहवाल प्राप्त झालेला आहे. वाहन चालक ताब्यात आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आलेली आहे. मयत मुलाच्या वडिलांचा जबाब घेऊन गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे रविंद्र शेळके यांनी सांगितले.