काय ते शहाजी बापू, काय त्यांच्या तोंडात मावा, शेजारी बसलं की समदा वास
शिवसेनेच्या या नेत्याने शहाजी बापूंच्या डायलाॅगची उडवली खिल्ली
सोलापूर दि ३०(प्रतिनिधी) – सोलापुरातील मोठं नाव असणाऱ्या शरद कोळी यांनी हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांसोबत मातोश्रीवर दाखल होत शिवबंधन बांधले. उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी उभ्या ठाकलेल्या कोळींनी आता थेट शिंदे गटात गेलेल्या शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय ते शहाजी बापू पाटील, काय त्यांच्या तोंडात मावा, शेजारी बसलं की समदं वास.. या शब्दात शरद कोळी यांनी शहाजी बापू पाटील यांची खिल्ली उडवली आहे. सांगोला मतदारसंघात शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले शहाजी बापू पाटील हे आता शिंदे गटात सामील झाले आहेत. त्याच शहाजीबापू पाटील यांच्यावर उद्धव ठाकरे समर्थक असणाऱ्या शरद कोळी यांनी बापूंच्याच डायलॉग स्टाईलमध्ये त्यांना मावा खाऊन वास येत असल्याचं म्हणत टोला लगावला आहे.सोलापूर जिल्ह्यात एकेकाळी चार मतदारसंघात एकट्या शिवसेनेचे आमदार होते. आता मात्र फक्त सांगोला मतदारसंघात शहाजी बापू पाटील यांचा रूपाने एकमेव आमदार राहिला आहे. त्यामुळे पक्षाची ताकद आणि संघटन वाढवण्याचा दृष्टीने उद्धव ठाकरेंकडून प्रयत्न होत आहेत.
शरद कोळी यांनी धाडस या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क सोलापुरात उभा केला आहे. ५ हजारांहून अधिक शाखा आपल्या संघटनेच्या असल्याचा दावा शरद कोळी यांनी केला आहे. आपण पक्ष पुन्हा उभा करु असा निर्धार त्यांनी केला आहे.