Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने केलं असं काही कि…पोलिसांनी केली अटक

(प्रतिनिधी – प्रियंका बनसोडे) – पुण्यासह पिंपरी-चिंचवड आणि आजूबाजूच्या भागांमध्ये मागील काही महिन्यांपासून दहशत माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड करणे, हातात धारदार शस्त्र घेऊन सार्वजनिक ठिकाणी जाणे अशा काही घटना पाहायला मिळतात.असाच एक प्रकार मुळशीमधून समोर आला आहे. मुळशीतील एका व्यावसायिकाने लोकांना भीती दाखवण्यासाठी महाळूंगे परिसरातील एका रेस्टॉरंट मध्ये गोळीबार केला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून रविवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब व्यंकटराव दराडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मुळशी मधील सुसगावचा रहिवासी आहे. हिंजेवाडी पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ११०, १२५ आणि भारतीय शस्त्रास्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाळासाहेब दराडे हा शुक्रवारी (२ ऑगस्ट) रात्री हॉटेल इमेज या एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गेला होता. तो या रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावरील वातानूकुलित विभागात बसला होता. मात्र त्यावेळी त्याने लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी रेस्टॉरंटच्या भिंतीवर गोळीबार केला. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आरोपी एक बांधकाम व्यावसायिक आहे.

बाळासाहेब दराडे याने केलेल्या गोळीबारामुळे रेस्टॉरंटमध्ये असलेल्या लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. काहीजण रेस्टॉरंटमधील त्यांच्या टेबलवरून उठून दूर पळून गेले. दरम्यान, आरोपीकडे बंदूक बाळगण्याचा परवाना असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी दराडे याला न्यायालयासमोर हजर केले. त्यानंतर त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्याची बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. त्यावेळी रेस्टॉरंटमध्ये असलेल्या इतर ग्राहकांकडे या प्रकरणाची चौकशी केली जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांनी दिली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!