
धंदा करायचा असेल तर मला दरमहा ३ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देऊन हप्ता देण्यास नकार दिल्याने गुंडाने टेम्पोला आग लावून दिली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे.
अक्षय बळीराम खळगे (वय २९) असे या गुंडाचे नाव आहे. याबाबत साजिद इत्तम सय्यद (वय २४) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना भोसरीतील इंद्रायणीनगरमधील उषाकिरण हॉटेलसमोर ३ ऑक्टोंबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचा टेम्पो घेऊन इंद्रायणी नगर कॉर्नरला उषा किरण हॉटेलसमोर होते. त्यावेळी अक्षय खळगे याने त्यांना अडवून धंदा करायचा असेल तर ३ हजार रुपये दरमहा मला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा खळगे याने शिवीगाळ करुन टेम्पो जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने टेम्पोला आग लावली. त्यात टेम्पोचा टायर, इंजिन, ड्रायव्हिंग सीट व इतर पार्ट जळून गेले. त्यात त्यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी अक्षय खळगे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.