
धक्कादायक! पोटच्या मुलानेच केली आई वडिलांची निर्घुण हत्या
या कारणामुळे इंजिनियर मुलाने केले दोन खून, असे उघडकीस आले हत्याकांड?
नागपूर – मुलानेच आपल्या आई वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. सर्वजण नवीन वर्षाचे स्वागत करत असताना नागपूर मध्ये घडलेल्या या दुहेरी हत्याकांडने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हत्या करणारा मुलगा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.
कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन म्हणून काम करणारे लीलाधर डाखोळे, त्यांची पत्नी अरुणा डाखोळे या संगीत शिक्षिकेचा खून त्यांचा मुलगा उत्कर्ष डाखोळे यानेच केल्याचे समोर आले आहे. उत्कर्ष इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला होता, तर त्याची बहिण सेजल बीएएमएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्ष गेली सहा वर्षे इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात नापास होत होता. सततच्या अपयशामुळे पालक त्याला शेती करण्याचा सल्ला देत होते. २५ डिसेंबर रोजी वडिलांनी त्याला मारहाण केली, तर आईने त्याची बॅग भरून ठेवत शेतीसाठी तयारी करायला सांगितले. त्यामुळे उत्कर्ष संतापला होता. त्यामुळे त्याने २६ डिसेंबरला दुपारी आईची हत्या केली. तर त्यानतंर संध्याकाळी पाचच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर त्यांचा चाकूने वार करत खून केला. धक्कादायक म्हणजे आई-वडिलांची हत्या केल्यानंतर त्याने बहिणीला आई-वडील मेडिटेशनसाठी बंगळुरूला गेल्याचं सांगत होता. तर बहिणीला त्याने काकाकडे राहण्यास सांगितले होते.
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक नातेवाईक घरी आलस असता दुर्गंधीमुळे त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता हे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. सध्या उत्कर्षला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.