
सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. इथं एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या लहान बहिणीसोबत लग्न करणं जीवावर बेतलं आहे. सासऱ्याने आपल्या जावयाची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली आहे. एका सासऱ्यानेच जावयाची अशाप्रकारे हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, किसन गडहिरे असं हत्या झालेल्या जावयाचं नाव आहे. किसन याचा विवाह झाल्यानंतर त्याने आपल्या पत्नीच्या लहान बहिणीला उच्च शिक्षणासाठी म्हणून आपल्या घरी शिकायला आणलं होतं. मात्र, यादरम्यान त्याची नियत बिघडली आणि त्याने आपल्याच मेहुणीवर वाईट नजर ठेवायला सुरुवात केली. कालांतराने त्याने तिच्याशी थेट विवाह केला.
या प्रकारामुळे त्याच्या पहिल्या पत्नीसह सासरे आणि इतर कुटुंबीयांच्या मनात जावयाविरोधात मोठा राग निर्माण झाला. सासरे अतुल कसबे, मेहुणे आणि कुटुंबीयांनी या लग्नाला तीव्र विरोध केला. याच वादातून किसन गडहिरे याने थेट आपले सासरे अतुल कसबे आणि आपल्या मेहुण्यावर तलवारीने वार करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. तो आपल्या बायकोच्या भावाला मारण्यासाठी मागून पाठलाग करत होता. या जीवघेण्या हल्ल्यादरम्यान संतापलेले सासरे अतुल कसबे याने भांडणात उडी घेत किसन याच्या डोक्यात दगड घातला आणि त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात जावई किसन गडहिरे याचा जागीच मृत्यू झाला. पती, पत्नी आणि मेहुणीच्या अनैतिक संबंधांच्या त्रिकोणातून सासऱ्याच्या हातून अशाप्रकारे जावयाचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक कसून तपास करत आहेत.

