
पतीने केली पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या
हत्येसाठी पतीने असा रचला कट, या कारणामुळे झाला खुलासा, आरोपीला अटक
कोटा – आजकाल विवाहबाह्य संबंधाच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशीच एक घटना राजस्थानमध्ये समोर आली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराची हत्या केली आहे.
रिंकी मेवाडा व गाैरव हाडा असे खून झालेल्यांचे नाव आहे. आरोपी गणेश मेवाडा याला पोलिसांनी मोहरीच्या शेतातून अटक केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशचे लग्न १२ वर्षांपूर्वी श्योपूर येथील रिंकी हिच्याशी झाले होते. त्यांना दोन मुले होती. मात्र, गेल्या एक वर्षापासून रिंकीचे कोटा येथील गौरव हाडा याच्याशी प्रेमसंबंध होते. तो नेहमीच नातेवाईकांना भेटण्याचे कारण सांगून रिंकीला भेटत होता. रिंकी आणि गाैरवच्या प्रेमसंबंधामुळे गणेश प्रचंड तणावात होता. तसेच गौरव त्याला धमकावत असे, की रिंकी त्याच्यावर प्रेम करते आणि त्याच्यासोबतच राहील. यामुळे गणेशने दोघांची हत्या करण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला गणेशने गाैरव आणि त्याच्या मित्राला घरी जेवणासाठी बोलवले. गाैरव आणि त्याचे मित्र घरी आल्यानंतर संधी साधून गणेशने धारदार हत्याराने गौरववर हल्ला केला. जेव्हा रिंकीने वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा गणेशने रागाच्या भरात रिंकीचाही खून केला. त्यानंतर गणेश घटनास्थळावरुन पसार झाला होता.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर रिंकीचा रक्ताने माखलेला मृतदेह आणि गौरव गंभीर अवस्थेत आढळला. रुग्णालयात नेल्यावर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. गणेशला मोहरीच्या शेतातून अटक करण्यात आली. पोलिसांनी हत्येचे हत्यार जप्त केले आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.