
नववधू टाॅयलेटला गेली पण परत आलीच नाही
दागिने आणि पैसे घेऊन नवरी गायब, आईही गायब, नवरदेव म्हणाला संसारासाठी...
गोरखपूर – लग्नाच्या दरम्यान बाथरूममध्ये जाण्याचे निमित्त करून नवरीने सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन पळ काढल्याची घटना गोरखपूर येथे ही घटना घडली आहे. वधूसोबत तिची आईही घटनास्थळावरून बेपत्ता झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एका ४० वर्षीय शेतकऱ्याच्या पत्नीचे निधन झाल्याने तो दुसऱ्या लग्नासाठी वधूच्या शोधात होता. एका व्यक्तीने वराकडून ३० हजार रुपये घेऊन त्याचे लग्न जुळवले. त्याने लग्नापूर्वीच होणाऱ्या पत्नीला साड्या, दागिने आणि लग्नाचा इतर खर्च दिला. त्यानंतर कुटुंबियांसोबत तो लग्न करण्यासाठी मंदिरात पोहोचला. तिथे नववधू तिच्या आईसोबत आली होती. पण लग्नविधी सुरु असताना वधूने टाॅयलेटचा बहाणा करुन तेथून पळ काढला. यादरम्यान तिची आईदेखील गायब झाली. माझा संसार पुन्हा मार्गी लावण्यासाठी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र सर्व काही लुटले आहे. अशी प्रतिक्रिया वराने दिली आहे.
स्थानिक पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. कोणी तक्रार दिल्यास चौकशी केली जाईल, असे दक्षिण पोलीस अधीक्षक जितेंद्र कुमार यांनी सांगितले.