
उमरगा – ठाकरे गटाचे उमरगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या आमदारकीवर धोक्याची टांगती तलवार आहे. त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवीण स्वामी यांच्याबरोबर ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
शिंदे गटाचे पराभूत झालेले माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे. चौगुले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी होईपर्यंत प्रवीण स्वामी यांच्या आमदारकीवर टांगती तलवार राहणार आहे. आमदार प्रवीण स्वामी यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, आमदार स्वामी यांनी खोट्या माहितीसह जातप्रमाणपत्र मिळवले आणि त्याचा गैरफायदा घेत निवडणूक लढवली. प्रवीण स्वामी हे अनुसूचित जातीतील असल्याचा दावा करून उमरगा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र नियमांनुसार वैध नसल्याचा आरोप चाैगुले यांनी केला आहे. सुरुवातीला ज्ञानराज चौगुले यांनी जात पडताळणी समिती धाराशिव यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. परंतू समितीने सदर प्रकरणी सुनावणी घेण्याचे अधिकार समितीस नसल्याचे कारण देत तक्रार फेटाळली होती. त्यानंतर माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
उमरगा विधानसभेची यंदाची निवडणूक अतिशय अटीतटीची झाली. या लढतीत प्रवीण स्वामी ९४५५० मते घेऊन विजयी झाले. तर ज्ञानराज चौगुले यांना ९११४२ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे चौगुले या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते.