
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. अश्यातच पुणेशिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत असून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पुण्यातून चिवटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत तणावाचे वातावरण होते. मात्र आता त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यासोबतच, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रताप भैया माने यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या जागांवरून महायुती निर्माण झालेला तिढा आता संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनीही अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर अडचण निर्माण झाली होती. एकाच आघाडीतील दोन उमेदवार मैदानात असल्याने मतविभाजनाची शक्यता व्यक्त केली जात होती.

अखेर पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानंतर मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज माघारीनंतर चिवटेंना माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया देत, “पक्षाचे वरिष्ठ नेते यावर भाष्य करतील, मी लहान कार्यकर्ता आहे,” असे विधान केले. चिवटे यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते या घडामोडींवर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजपने महायुतीकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप उर्फ भैय्या माने यांनीही अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये पेच निर्माण झाला होता. अखेर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मानेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे आणि सुमित कदम यांनीही माघार घेण्याची विनंती केल्याचे मानेंनी सांगितले


