भ्रष्टाचारप्रकरणी माजी पंतप्रधानांना १४ वर्षाची शिक्षा
पत्नीलाही ७ वर्षाची शिक्षा, ट्रस्टमधील 'हा' घोटाळा अंगलट, दंडही ठोठावला, नेमके प्रकरण काय?
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना देखील शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
यासोबतच न्यायालयाने इम्रान खान यांना १० लाख तर, त्यांची बुशरा बीबी खान यांना ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टशी संबंधित १९० दशलक्ष पौंड घोटाळ्यात ही शिक्षा देण्यात आली आहे. याशिवाय त्यांची पत्नी बुशरा बीबी हिलाही या प्रकरणात दोषी ठरवून ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेला भ्रष्टाचार पाहता न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणी १४ वर्षांची तर त्यांच्या पत्नीला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. डिसेंबर २०२३ मध्ये पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) हा गुन्हा नोंदवला होता. इम्रान खान, बुशरा बीबी आणि इतर ६ जणांनी मिळून १९० दशलक्ष पौंड (सुमारे ५० अब्ज पाकिस्तानी रुपये) राष्ट्रीय तिजोरीचे नुकसान केल्याचा आरोप आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरण हा पाकिस्तानातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा आहे. याआधी इस्लामाबादच्या भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाने निकाल देण्यासाठी १७ जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. स्थानिक मीडियाच्या बातम्यांनुसार, न्यायमूर्ती नासिर जावेद राणा यांनी गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी या खटल्याची सुनावणी पूर्ण केली होती, तर त्यांनी निकाल देण्यासाठी २३ डिसेंबरची तारीख राखून ठेवली होती. पण अखेर आज निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
इम्रान खानसाठी हा मोठा राजकीय धक्का आहे. पाकिस्तानमधील भ्रष्टाचारविरोधी मोहिमेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयाचा पाकिस्तानच्या राजकारणावर आणि सरकारी पारदर्शकतेवर व्यापक परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पुढील कायदेशीर कारवाईची शक्यता वाढू शकते.