
‘राहुल सोलापूरकर जिथे सापडतील तिथे त्यांना गोळ्या घाला’
कोणी दिला इशारा? छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे सोलापूरकरांवर टीकेची झोड
सातारा – मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत वादग्रस्त विधान केले होते. यानंतर आता भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन सुटून महाराष्ट्रात परतले, असा दावा राहुल सोलापूरकर यांनी केला होता. राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना, उदयनराजे भोसले यांनी, सोलापूरकरांवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे अशी मागणी केली. तसेच “मला वाटतं की अशा लोकांना जिथे सापडेल तिथे गोळ्या घातल्या पाहिजेत.” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. महापुरुषांविषयीचे असे वक्तव्य व्हायरल करणाऱ्यांवर डिजीटल सेन्सॉरशिप असली पाहिजे, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. इतिहासाची माहिती असणाऱ्याकडून याची तपासणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. राहुल सोलापूरकर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे म्हणाले आहेत.विकृत विधाने करणाऱ्या व्यक्तीचे चित्रपट किंवा ते जिथे जिथे अभिनय करत असतील, ते ते हाणून पाडले पाहीजे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही अशा लोकांना थारा दिला नाही पाहीजे, असेही उदयनराजे म्हणाले आहेत.
ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होते. त्यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती महाराजांबाबत वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला होता. दरम्यान यावर वादंग निर्माण झाल्यावर त्यांनी माफी मागितली आहे. पण शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.