
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाच्या बस म्हणजे लाल परी धावतात. गावागावाला जोडणाी ही लालपरी सर्वसामान्यांसाठी आधार आहे. पण एका एसटी बसमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढरीहून भंडारातून निघालेल्या एसटी बसमधून रात्रीच्या वेळी दोन विद्यार्थीनींना रोहा गावातच उतरवण्यात आलं. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना पालकांना आणि ग्रामस्थांना समजल्यानंतर एकच संतापाची लाट पसरली आहे. भंडारा एसटी स्टँडहून मुंढरीसाठी बस क्रमांक एम.एच. 40 वाय 5008 रात्रीच्या वेळेत निघाली. या बसमधून मुंढरीसाठी दोन विद्यार्थीनींनी प्रवास करत होत्या. पण जेव्हा ही बस रोहा गावाला पोहोचली तेव्हा एक धक्कादायक घटना समोर आली. या दोन विद्यार्थींनींना अचानक बसमधून उतरण्यास सांगितलं. ही घटना घडली तेव्हा बरीच रात्र झाली होती. या दोघींना बस चालक आणि वाहक यांनी सांगितलं की, रोहाहून मुंढरीला जाणाऱ्या तुम्ही दोघीच आहेत. त्यामुळे तुम्ही इथेच उतरा ही बस आता मुंढरीला जाणार नाही. फक्त दोन प्रवाशांसाठी बस मुंढरीला जाणार नाही, असं कारण त्या बस चालकाने आणि वाहकाने दिलं. हा संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी जिल्हा परिषदचे शिक्षण आणि बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांना सांगितला. त्यांना घटनेची माहिती मिळताच नियोजित दौरा रद्द करून ते रोहा गावात पोहोचले. त्यानंतर त्यांनी एसटी चालक आणि वाहकला या कृत्याबद्दल जाब विचारला. एवढंच नाहीतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या दोघांची तक्रार केली. शिवाय या दोघांवर कडक कारवाईची मागणी केली. बसमध्ये एक प्रवाशी असो किंवा दहा प्रवासी बस नियोजित गावातून निघाल्यावर नियोजित स्थळी सुरक्षितरित्या पोहोचणे ही एसटी प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या बस चालक आणि वाहक यांच्या बेजबाबदारपणा आणि कृत्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी जर या दोन विद्यार्थीनींसोबत काही घडलं असतं तर, असा चिंतेतून पालक घाबरले आहेत.


