
रस्त्यावर स्टंटबाजी केली आणि पोलीसांच्या जाळ्यात अडकले
तरुणांचा रस्त्यावरचा जीवघेणा स्टंट सोशल मिडीयावर व्हायरल, नंबर प्लेट काढल्या पण तरीही...
हैद्राबाद – हैदराबादमधील आऊटर रिंग रोडच्या मध्यभागी एका लक्झरी एसयूव्हीमध्ये स्टंट केल्याबद्दल दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
स्टटबाजी प्रकरणी मोहम्मद ओबैदुल्ला आणि मलकपेट येथील रहिवासी जोहैर सिद्दीक यांना अटक केली. त्यांच्या आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. ही घटना ९ फेब्रुवारीला घडली होती. तरूणांनी ओळख पटू नये म्हणून वाहनांच्या नंबर प्लेट काढून टाकल्या होत्या, परंतु त्यांचे चेहरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होते. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, रस्त्याच्या मध्यभागी एक फॉर्च्युनर डोनट्स स्टंट करताना दिसत आहे, तर एक बीएमडब्ल्यू कारमधील चालकही हाच स्टंट करताना दिसतो आहे. ओआरआर स्ट्रेचवर बसवलेल्या क्लोज-सर्किट कॅमेऱ्यांनी हा स्टंट कॅमे-यात कैद केला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओवर संतापही व्यक्त केला आहे.
हल्ली तरूणांमध्ये रीलसाठी करण्यात येणाऱ्या अशा खतरनाक स्टंटबाजीचे व्हिडीओ हे चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. अशा अनेक घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. ज्यात तरूणांनी रीलसाठी नको ती स्टंटबाजी करत आपला जीव देखील गमवला आहे.