कोरोनामुक्त, शासनाच्या निर्बंध शिथील आणि पुणे पोलिसांची कोणतीही नियमावली नसताना होऊ घातलेल्या पुण्यातील वैभवाशाली गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीची सांगता शुक्रवारी (दि. ९) होत असताना ध्वनी प्रदूशनाची कोणाकडून तक्रार आली तर गुन्हे दाखल करू, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली असून, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, दुसरीकडे शहरात पाचव्या आणि नवव्या दिवशी विसर्जन मिरवणूकीत डीजेंचा आवाज मोठाच राहिला आहे. त्यामुळे यंदा मिरवणूकीत डीजे दणदणाट अन् ढोल-ताशांचा कडकडाटच पुणेकरांना पाहिला मिळणार असल्याचे दिसत आहे.पुणे पोलिसांनी गणेश विसर्जन मिरवणूकीनिमित्ताने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळी दहा वाजता बंदोबस्ताला सुरूवात होणार आहे. सीपी टू कॉन्स्टेबल असणारा यंदाचा बंदोबस्त तगडा असून, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताची माहिती (ब्रिफींग) देण्यात आले आहे. शहरात आठ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. तर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी केली आहे. विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत शहर व उपनगर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. यासोबतच विसर्जनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने, मोबाइल हिसकावणे तसेच महिलांची छेडछाड या घटना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार आहेत.शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरीत वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीत संशयित व्यक्ती किंवा बेवारस वस्तू आढळल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षात किंवा बंदोबस्तावरील पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.