
प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीची आत्महत्या
प्रियकरावर गुन्हा दाखल, पोलिसांना दिलेल्या जवाबात तरूणीचा धक्कादायक खुलासा
कोल्हापूर – एकतर्फी प्रेमाच्या त्रासाने कंटाळून कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणीचा आज मृत्यू झाला. याप्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामुळे खळबळ उडाली आहे.
गायत्री ऊर्फ सानिका माणिक पोवार असे तरुणीचे नाव आहे. आदित्य दिलीप पाटील असे प्रियकराचे नाव असून, याप्रकरणी त्याच्यावर पन्हाळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. सानिका आणि आदित्य पाटील यांचे प्रेमसंबंध होते. ती काॅलेजला जातो म्हणून घरातून बाहेर पडली होती. दुपारी तिच्या मैत्रिणीचा तिच्या वडिलांना फोन आला की, तिने औषध प्राशन केले असून, आदित्यने तिला उपचारांसाठी खासगी दवाखान्यात दाखल केले आहे. त्यानंतर सानिकाच्या आईने फिर्याद दिल्याप्रमाणे आदित्यला पन्हाळा पोलिसांनी मामाच्या घरातून अटक केली होती. तीन दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. पण उपचार सुरू असताना सानिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे अदित्यवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामिनावर मुक्तता केल्याने न्यायालयीन आदेशानंतर आदित्यला ताब्यात घेणार आहे. मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने आदित्य पाटील हा वारंवार लग्नाची मागणी करत होता; पण मला आई वडिलांचे संमतीशिवाय लग्न करायचे नाही असे त्याला सांगितले होते. तरीही तो मला त्रास देतच होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून मी कीटकनाशक घेतले असे नमूद केले आहे. या प्रकरणी तपास सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, अधिक चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल, अशी माहिती पन्हाळा पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनी दिली आहे.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आदित्यने सानिकाचा घात केला आहे. त्याचे ती ऐकत नव्हती म्हणून त्याने तिला तणनाशक जबरदस्तीने पाजले. त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सानिकाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.