
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नव वधूने घेतला जगाचा निरोप
दारातील मंडपही तसाच ओल्या हळदीच्या अंगाने जानकीसोबत काय घडले? सारा गाव हळहळला
माळशिरस – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसच्या बाभूळगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचे निधन झाल्याने आनंदाचे वातावरण क्षणात बदलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माळशिरस तालुक्यातील पराडे आणि गळगुंडे हे दोन्ही कुटुंब लग्न सोहळ्याच्या आनंदात होते. पण क्षणात सारेच वातावरण शोकाकूल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव येथील समीर हरिदास पराडे याचा १३ मे रोजी माढा तालुक्यातील घोटी येथील जानकी बाळासाहेब गळगुंडे हिच्याशी निरा नरसिंहपूर येथील मंगल कार्यालयात मोठ्या दिमाखात विवाह सोहळा संपन्न झाला होता. लग्नानंतर नववधू सासरी आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक छातीत कळा येऊ लागल्याचं जाणवलं. त्यानंतर कुटुंबियांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच नववधू जानकीवर काळाने घाला घातला आणि जानकीचा मृत्यू झाला. पराडे कुटुंबातील सून व गळगुंडे कुटुंबाची लेक असलेल्या जानकीच्या अचानक झालेल्या मृत्युने दोन्ही कुटुंबांच्या आनंदावर विरझण पडले असून दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नववधू जानकी हिच्यावर माळशिरस तालुक्यातील बाभुळगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
विवाह हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा सर्वात मोठा क्षण असतो. लग्नगाठ बांधून सुखी संसाराची स्वप्न नवदाम्पत्य पाहत असतात. मात्र जानकी आणि समीर यांच्यावर मात्र काळाने घाला घालत आनंद हिरावून घेतला आहे.