
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात महिला नेत्याचे स्वतःच्या पतीवर गंभीर आरोप
पती गुन्हेगारांना पोसत असल्याचा आरोप, महिला मंत्र्यावरही टिका, अजित पवारांवर प्रश्नांची सरबत्ती, प्रकरण काय?
बीड – बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिवराज दिवटे मारहाण प्रकरण चांगलेच तापले आहे. शिवराज दिवटे याला रिंगण करत बेदम मारहाण करण्यात आली होती. आता या प्रकरणात माजी मंत्री आणि विद्यमान आमदाराच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केला आहे.
करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. शिवराज दिवटे यांना झालेल्या मारहाणीमागे धनंजय मुंडे यांच्याच गुंडांचा हात आहे, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. त्या म्हणाल्या की, बीडमधील सगळ्या गुंडांना धनंजय मुंडे पोसत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरच कारवाई करण्याची गरज आहे. देशांमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले तसेच ऑपरेशन हे बीडमध्ये सुद्धा राबवा. कारण या ठिकाणी अनेक गुन्हेगारी टोळ्या आहेत. जवळपास आठ ते दहा हजार गुन्हेगार आहेत. या सगळ्यांचा एन्काऊंटर करून टाका, अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांना विनंती आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोघेही गुन्हेगारांच्या टोळ्या बीडमध्ये पोसत आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे दोन्ही एका माळेचे मणी आहेत. दोघांमध्ये कुठलाही फरक नाही, असा आरोप करुणा मुंडे यांनी केला.मंत्रीपदाबाबत बोलताना करुणा मुंडे यांनी सांगितले की, धनजय मुंढे यांचे मंत्रिपद बीडमधील इतर आमदाराला द्यावे. त्यांच्याकडे हे पद गेल्यास मी पुन्हा लढा देईल. पंकजा मुंडे मंत्री असल्यामुळे अजूनही धनजय मुंढे गुन्हेगारांच्या पाठीशी आहेत, असे करुणा मुंडे यांनी सांगितले. अजित पवारांवरही टीका करत त्यांनी “जे पुण्यात गुन्हे थांबवू शकले नाहीत, ते बीडमध्ये काय थांबवणार?” असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच “संपूर्ण जिल्ह्यात आठ ते दहा हजार गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना राजकीय पाठबळ दिलं जात असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी रुग्णालयात शिवराज दिवटेची भेट घेतली. दिवटेच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घटनेचा तीव्र निषेध केला होता.