
‘पुन्हा आमच्या नादाला लागला तर चेंदामेंदा करून टाकीन
जमिनीच्या वादातून दोन गटात जोरदार वाद, महिलांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल, तणाव स्थिती
शिरूर – शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात जमिनीच्या वदातून दोन गटात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. यात महिलांना मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना ३ जूनला न्हावरे येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महेश हनुमंत देशमुख यांच्या घरी आरोपी त्रिंबक दादाभाऊ हिंगे, कमल त्रिंबक हिंगे, साधना शंकर देशमुख आणि यशश्री सचिन हिंगे यांनी हल्ला चढवला. शेतजमिनीच्या वादातून सुरू झालेल्या या भांडणात कमल हिंगे यांनी महेश यांच्या पाठीवर उसाच्या टिपऱ्याने मारहाण केली आहे. शेतजमिनीच्या वाटपावरून सुरु झालेल्या वादातून शिवीगाळ व दमदाटी करत कमल हिंगे यांनी महेश यांच्या पाठीवर उसाच्या टिपऱ्याने मारहाण केली. साधना देशमुख व त्रिंबक हिंगे यांनी महेश यांच्या बहिणी प्रियंका व रूपाली यांच्या केसाला धरून ओढले व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्रिंबक हिंगे याने महेश यांच्या आई मंदा देशमुख यांच्यावरही हातातील काठीने हल्ला करत गंभीर दुखापत केली. प्रियंका हिला देखील डोक्यात व हातावर काठीने मारहाण केली. त्यानंतर “पुन्हा आमच्या नादाला लागला तर चेंदामेंदा करून टाकीन,” अशी जिवे मारण्याची धमकीही दिली गेली. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार बनकर करत आहेत. या घटनेमुळे न्हावरे गावात तणावाचे वातावरण आहे. शेतजमिनीच्या वादातून वांशिक संघर्ष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.