
सोनम बेवफा! बायकोनेच केली पतीची हत्या
शिलाँगच्या नवदांपत्य बेपत्ता प्रकरणात धक्कादायक खुलासा, पत्नीनेच दिली हत्येची सुपारी, प्रेमप्रकरणाचा संशय?
शिलाँग – मेघालयातील शिलाँग इथे हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता होण्याचं गूढ अखेर उलगडलं आहे. शिलाँगमध्ये राजा रघुवंशी याची हत्या करण्यात आली होती. त्याची पत्नी सोनम हिनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रघुवंशी बेपत्ता प्रकरणात दररोज नवनवे ट्विस्ट समोर येत होते, मात्र आता या प्रकरणात पत्नीचाच हात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी पत्नी सोमन रघुवंशी आणि तिच्या ३ साथीदारांना उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकल्या आहेत. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सोनमने नवऱ्याला संपवण्यासाठी ३ जणांना सुपारी दिल्याचे तपासातून समोर आले आहे. राजा आणि सोनम ११ मे रोजी लग्नबंधनात अडकले होते. मोठ्या थाटात लग्नसोहळा पार पडला होता. २० मे रोजी ते हनीमूनसाठी मेघालयला गेले. मात्र, २३ मे रोजी दोघेही बेपत्ता झाले होते. पण २ जून रोजी राजाचा मृतदेह शोहरा परिसरातील एका खोल दरीत सापडला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील नंदगंज पोलीस ठाण्यात शरण आली. तिच्यासह मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना रात्रीच्या छापेमारीत अटक करण्यात आली. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.
डीजीपी नोंग्रंग यांनी सांगितले की, अटक केलेल्या आरोपींनी सोनमने हत्या करण्यासाठी त्यांना पैसे दिल्याची कबुली दिली आहे. मध्य प्रदेशात इतर संशयितांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे.