
देवेंद्र फडणवीसांची सत्तेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंना ऑफर
एकत्र येण्यासाठी फडणवीसांची ठाकरेंना साद, एकनाथ शिंदेवर दबाव, म्हणाले इथं यायचं असेल तर बघा, स्कोप...
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच थेट सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस आज विधान परिषदेत बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांचा निरोप समारंभ आज सभागृहात पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे. उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही. आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. त्यांनी भोंग्यानविरोधात अनेक निवेदनं दिली. ते कट्टर सावरकरवादी आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत. असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नुकतीच आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांची युती झाली आहे. त्यातच आजच विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली आहे. फडणवीसांच्या ऑफरनंतर सभागृहात हास्यकल्लोळ झाला मात्र राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती बघता कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे भाजपासोबत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण या चर्चेमुळे एकनाथ शिंदे आणि गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षादरम्यान ते विधानसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकवेळा आरोप प्रत्यारोपांचा सामना झाला आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे पडद्यामागे राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे.