
त्या दोन शिक्षकांनी मला त्रास दिला, माझ्या मृत्यूला तेच जबाबदार आहेत
शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थींनीची आत्महत्या, सुसाईटनोटमुळे प्रकार उघडकीस, प्रकरण काय?
नोएडा – ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठातील वसतिगृहात बीडीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे.
ज्योती शर्मा असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. विद्यार्थिनीने सुसाइड नोट देखील लिहली आहे, ज्यात तिने प्राध्यापकांवर गंभीर आरोप केले आहेत, दोघांना तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. ज्योती शर्मा बीडीएसच्या द्वितीय वर्षात शिकत होती. ज्योतीने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, जर मी मेलो तर पीसीपी आणि दंत वैद्यकीय शिक्षक यासाठी जबाबदार असणार आहेत. महेंद्र सर आणि शार्ग मॅम माझ्या मृत्यूला जबाबदार आहेत. मला त्यांनी तुरुंगात जावे असे वाटते. त्यांनी मला मानसिक त्रास दिला. त्यांनी माझा अपमान केला. त्यांच्यामुळे मी बऱ्याच काळापासून नैराश्यात आहे. त्यांनीही असेच भोगावे असे मला वाटते. माफ करा… मी आता जगू शकत नाही. ज्योतीवर बनावट सही केल्याचा आरोप होता. त्यामुळे ती बरीच त्रस्त होती. तिला तीन दिवस पीसीपी विभागात खेटे मारायला लावले. तिच्या विभागाच्या प्रमुखांना (एचओडी) फाईल देण्यात आली. यानंतर सर म्हणाले की, आपल्या पालकांना बोलवा. तू स्वतःच फाईलवर सही केली आहे, असे विद्यार्थ्याने सांगितले. सोमवारी तिचे पालक आले आणि त्यानंतर ज्योतीला तिची फाईल मिळाली, असा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पालकांनी आणि इतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोन्ही शिक्षकांना अटक केली आहे.
ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त (एडीसीपी) सुधीर कुमार यांनी सांगितले की, ‘पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.