
दिग्गज माजी क्रिकेटपटूच्या लेकीवर या देशाची मोठी जबाबदारी
११३७ कोटींच्या मोहिमेत सहभागी होणार, पर्यटनाला अच्छे दिन आणण्यासाठी विशेष अभियान, जाणून घ्या?
मुंबई – माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणार आहे. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणार आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर हिची एक नवी ओळख आता समोर आली आहे. क्रिकेट विश्वात वडिलांनी निर्माण केलेल्या लौकिकानंतर, सारा स्वतःच्या दमावर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकू लागली आहे. सचिन आणि आॅसी संघात कायमच स्पर्धा दिसून आली होती. आॅसीचे घातक गोलंदाजी पथक सचिनपुढे नांगी टाकत होते. पण आता लेक सारा मात्र त्यांना मदत करणार आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या १३ कोटी डॉलर्स खर्चाच्या विशेष पर्यटन मोहिमेसाठी सारा तेंडुलकर हिला भारतातील ‘ब्रँड अॅम्बेसडर’ म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियन सरकार लवकरच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ‘Come and Say G’day’ नावाची भव्य पर्यटन मोहीम सुरू करत आहे. या मोहिमेअंतर्गत, विविध देशांमध्ये पर्यटनाचा प्रचार करण्यासाठी स्थानिक स्तरावर लोकप्रिय आणि विश्वासार्ह व्यक्तींना ‘ब्रँड अॅम्बेसडर’ म्हणून जोडले जात आहे. भारतामधील चेहरा म्हणून सारा तेंडुलकरची निवड झाल्यामुळे तिला आता देशाबाहेरही सुपरस्टार म्हणून मान्यता मिळाल्याचं स्पष्ट होत आहे. ही मोहीम जवळपास 13 कोटी डॉलर्स ( अंदाजे 1080 कोटी रुपये) इतक्या मोठ्या खर्चात राबवण्यात येणार असून, त्याद्वारे ऑस्ट्रेलियातील सुट्ट्यांचा अनुभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भारतातून सारा तेंडुलकरची विशेष अभियानासाठी निवड केली आहे. अमेरिकेचे वन्यजीव संरक्षणतज्ज्ञ रॉबर्ट इर्विन, ब्रिटनच्या खाद्य लेखिका आणि टीव्ही कूक निगेला लॉसन, चिनी अभिनेते योश यू, जपानी हास्य कलाकार अबारेरु कुन यांचाही समावेश आहे.
सारा तेंडुलकर ही आजवर सोशल मीडियावर आणि फॅशन ब्रँड्सच्या मोहिमांमध्ये अॅक्टिव्ह होती. तिची प्रसिद्धी ही एक सेलिब्रिटी मुलगी म्हणून मर्यादित राहिली होती, मात्र आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावरील सरकारी मोहिमेची ब्रँड अॅम्बेसडर झाल्याने तिच्या करिअरमध्ये मोठी झेप घेतल्याचं दिसत आहे.