
दुर्देवी! एसीमुळे एका विवाहीतेचा करूण अंत
एसीमुळे झाली आयुष्याची राखरांगोळी, घरात असलेल्या पल्लवीसोबत काय घडले?
सोलापूर – सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरातील एअर कंडिशनर मध्ये झालेल्या स्फोटामुळे एका ४० वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पल्लवी प्रवीण सग्गम असे मृत महिलेचे नाव आहे. त्या आपल्या घरात बसल्या असताना अचानक एसीचा स्फोट झाला. स्फोटानंतर तत्काळ शॉर्टसर्किट होऊन घरभर झपाट्याने आग पसरली. आगीच्या ज्वाळा एवढ्या भीषण होत्या, की पल्लवी सग्गम यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. दरम्यान, आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहताच आरडाओरडा सुरू केला आणि तातडीने पोलिस तसेच अग्निशमन दलाला कळवले. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अनेक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घरात तपासणी केली असता, पल्लवी सग्गम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून, त्यामागे एसीचा स्फोट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.