Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! महिला खासदाराला बलात्काराची धमकी

धमकी देणारा 'या' कंपनीचा कर्मचारी, कंपनीकडून चौकशीचे आदेश, प्रकरण काय?

दिल्ली – बिजू जनता दलाच्या खासदार सुलता देव यांना महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्याने बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सुलता देव यांनी याचे स्क्रीनशॉट व्हायरल करताच मोठी खळबळ उडाली आहे.

सुलता देव यांनी १७ ऑगस्ट रोजी एक्सवर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक आरोप केला होता. महिंद्रा कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्यावर बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा खासदार सुलता देव यांनी केला आहे. सुलता देव यांनी केलेल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले, नाशिकमध्ये महिंद्रा कंपनीत काम करणारा कर्मचारी आणि भाजपचा कथित कार्यकर्ता एका महिला खासदारावर बलात्कार करण्याची आणि तिला जिवे मारण्याची उघड धमकी देत आहे. खासदाराबरोबर हे होत असेल तर देशातील सामान्य महिलांची परिस्थिती कशी असेल? असा प्रश्न उपस्थित करणारी पोस्ट सुलता देव यांनी लिहिली आहे. यासोबतच काही स्क्रिनशॉटही जोडले आहेत. तसेच या प्रकरणावर पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत, असे त्यांनी म्हटले होते. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना टॅग केले होते. आता महिंद्रा ग्रुपने यावर अधिकृत भूमिका मांडली आहे. सत्यब्रत नायक या महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्याने त्यांना कमेंटमध्ये ही धमकी दिली होती. प्रकरण वाढल्याचे समजताच महिंद्रा ग्रुपने सोमवारी एक निवेदन जारी केले. आमच्या एका कर्मचाऱ्याने फेसबुकवर एका राजकीय नेत्याला काही अपमानास्पद आणि अनुचित संदेश पाठवल्याचे आम्हाला कळले आहे. महिंद्रा ग्रुपने नेहमीच मानवी प्रतिष्ठेला महत्त्व दिले आहे. आम्ही आदराचे वातावरण राखण्यावर विश्वास ठेवतो. या तत्त्वांचे उल्लंघन आम्ही सहन करत नाही. आम्ही हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहोत आणि तात्काळ चौकशी सुरू केली आहे. जर आरोप खरे आढळले तर आमच्या आचारसंहिता आणि मूल्यांनुसार कठोर कारवाई करू, असे कंपनीने म्हटले आहे.

२ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील एस्म रुग्णालयात ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात पीडित अल्पवयीन मुलीच्या जबाबाचा एक व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल झाला होता. या व्हिडीओच्या पोस्टला कमेंट करताना सदर धमकी दिल्याचे सुलता देव यांनी सांगितले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!