
मराठा आंदोलनाची धग वाढणार, मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय
राज्य सरकारच्या अडचणी वाढणार, मनोज जरांगे यांच्या घोषणेमुळे आंदोलक आक्रमक, या नेत्यावर सडकून टीका
मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे. उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या ७० वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, असं सांगितले जात आहे, पण ते प्रत्यक्षात मिळालेच नाही. आज लाखो गरीब मराठा मुंबईत आले आहेत. सर्व समाजातील गोरगरीब लोक या आंदोलनात सेवा करत आहेत. जर राज्यातील गरीब मराठे मुंबईकडे येत असतील, तर त्यांनी आपली गाडी थेट ग्राउंडवर आणू नये. रेल्वेने आझाद मैदानावर पोहचावे. गाड्या सुरक्षित राहतील, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत. त्यांनी आंदोलनकर्त्यांना आवाहन केले की, तुम्ही जेवण घेऊन मुंबईकडे येत असाल तर ते जेवण तुम्ही पार्किंग ठिकाणीच वाटप करा, अन्यथा काही लोक उपाशी राहतील. अन्नछत्र सुरू करणाऱ्यांनी यासाठी पैसे मागू नयेत. गरीबांचे रक्तपिपासू होऊ नका. जर कोणी पैसे मागत असेल, तर मी थेट माध्यमांमधून त्यांची नावे जाहीर करीन. उद्या जरांगे पाटील पाणी पिणं थांबवत असल्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आंदोलन सरकारसमोर एक गंभीर नैतिक प्रश्न उभा करत आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाकडून अजून ठोस प्रतिसाद आलेला नसल्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वादळाच्या केंद्रस्थानी आला आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार मनोज जरांगेंनी केला आहे. त्यांनी सांगितले की, ‘मराठा समजााच्या एकाही पोराने दगडफेक करायची नाही. समाजाला मान खाली घालावी लागेल असे एकही पाऊल उचलायचे नाही. त्यांनी अन्याय करू द्या, तुम्ही शांत राहा. मी आरक्षण मिळवून देणार, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. तुम्ही फक्त शांत राहा, असे जरांगे म्हणाले आहेत.
अन्नछत्र ज्यांनी सुरु केलं त्यातून पैसे मागू नका. गरिबांचं रक्त पिऊ नका. मी डायरेक मिडीयात नावं घेईल. मी कोणाला बोलतोय हे त्याला कळतंय. तू लोकसभेत सुद्धा पैसे लोकांकडून घेतले. तुझे डिझेल खर्च झाले त्याचा हिशोब करतो आणि तुझे पैसे देतो. तू रेनकोट वाटले आणि कोणाकडून पैसे घेतले हे माहित आहे. दादा असशील का पादा असशील. महाराष्ट्राच्या मराठ्यांनी कोणालाही पैसा द्यायचा नाही, असे देखील जरांगे यांनी यावेळी ठणकावून सांगितले आहे.