शिवसेनेनंतर आता शिंदे गटाचे थेट भाजपलाच खिंडार
महापालिका निवडणूकी आधी दोन्ही पक्षात दबावाचे राजकारण जोरात
मुंबई दि १८ (प्रतिनिधी) – शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सुरुवातीला शिवसेना नंतर काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी फोडल्यानंतर आता थेट भाजपाला खिंडार पाडले आहे. शिंदे गटाच्या जागेवर भाजपाने दावा केल्यानंतर त्याला उत्तर म्हणून शिंदे गटाने हे राजकारण केल्याची चर्चा आहे. यातुन शिंदेगट आणि भाजपात शीतयुद्ध सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबईतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या उपस्थितीत प्रभाग क्र.२५ च्या भा.ज.पा माजी वार्ड अध्यक्षा प्रीती इंगळे यांच्यासह १०० महिलांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. पण आता भाजपमधील नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पण भाजप आणि शिंदे गट एकत्र महापालिका निवडणुका लढवणार असल्याची चर्चा असताना पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीमुळे वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. यातुन वादाची ठिणगी तर पडणार नाही ना अशीही चर्चा आहे. यावर भाजपाने प्रतिक्रिया दिली नसली तरी आगामी काळात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटाने भाजपाशी जवळीक साधली भाजपानेही त्यांना मुख्यमंत्री पद दिले. पण खातेवाटपात महत्त्वाची खाती स्वतः कडे ठेवत शिंदे गटाला शह दिला. त्यामुळे शिंदे गटाने दबावाचे राजकारण करताना भाजपाचे पदाधिकारी फोडले आहेत.