
मनोरंजनसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील मिरा रोड परिसरात एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या मोलकरणीची हत्या केल्याचं समोर येत आहे. महिलेचा खून करून आरोपी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याला मीरा रोड पोलिसांनी शुक्रवारी विशाखापट्टणम येथून अटक केली आहे.

शरीरसुखाची मागणी महिलेने नाकारल्यामुळे आशिषने तिचा जीव घेतलाच प्राथमिक तपासात उघड झाले आहे. आशिष मेश्राम हा टीव्ही अभिनेता असून काही नावाजलेल्या मालिकांमध्ये तो झळकला आहे. या प्रकरणाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.संबंधित मृत महिलेच्या पश्चात तिचा पती आणि चार मुलं असा परिवार आहे. तिचा पती चप्पल दुरुस्तीचे काम करतो, तर मोठा मुलगा खाजगी कंपनीत कामाला आहे. आठ नऊ घरांमध्ये घरकाम करून ती महिला कुटुंबाला हातभार लावायची . गेल्या तीन वर्षांपासून ती अभिनेता आशिष मेश्रामच्या घरी काम करायची.

काशिमिरा या भागात वास्तव्यास असलेली मृत महिला सिल्वर पार्क येथील चंद्रेश आर्केड इमारतीत काही दिवसांपासून घरकाम करत होती. बुधवारी सायंकाळी घरकाम करत असलेल्या घराच्या दरवाजात गंभीर जखमी अवस्थेत महिला दिसली. शेजारी राहणाऱ्या महिलेला हे दिसून आलं. तिने आजूबाजूच्या इतर नागरिकांना बोलवून महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखलही केलं, मात्र तिचा मृत्यू झालेला होता. महिलेच्या गळ्यावर छातीवर आणि पोटावर चाकूने वार केल्याचं आढळून आलं. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. घटनेनंतर आरोपीने पळ काढला. मीरा रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिनेता सोसायटीमध्ये शिरताना आणि तिथून बाहेर पडताना अत्यंत घाईत असल्याचे दिसून आलं. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे माग काढत त्याला विशाखापट्टणम येथून अटक केल्याचा समोर आलं आहे.


