
नाशिकचा विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण उघडकीला आल्यानंतर सुरुवातीला रुपाली चाकणकर यांची ठामपणे पाठराखण करणारे राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांचा सूर पूर्णपणे बदलला आहे.

रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. यानंतर शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांचा विषय आल्यानंतर दत्तात्रय भरणे यांचा सूर एकदम बदलल्याचे दिसून आले.आम्ही कुठलाही महाराज आणि बुवाबाजीच्या विरोधात असतो. अजितदादांनी आम्हाला तशी शिकवण दिली आहे. आम्ही भोंदूबाबांना कधी जवळ केले नाही. अशोक खरात कोण आहे, हे मला माहिती नव्हते. या लोकांना ठोकून काढले पाहिजे. जेणेकरुन इतर कोणताही महाराज असे कृत्य करणार नाही. हे महाराज लोकांना फसवतात, नादी लावतात. काही लोक त्यांचा प्रचार करतात. पण खरात भोंदूबाबा आहे. मला माहिती नव्हतं तो कसा आहे, मी सहज बोलून गेलो होतो, असे स्पष्टीकरण दत्तात्रय भरणे यांनी दिले. मी आधी जेव्हा बोललो होतो, तेव्हा मला बाबा अशोक खरात याच्याबाबत जास्त माहिती नव्हती. मला एकंदर हे प्रकरण माहिती नव्हते. पण नंतर कळालं की, अशोक खरात हा भोंदूबाबा आहे. अशा लोकांना वेगळ्याप्रकारे ठोकून काढले पाहिजे. महाराष्ट्रात चांगले महाराजही आहेत. पण 100 पैकी एखादवेळी अशी गोष्ट घडते आणि तेच तेच वाजवले जाते. काही लोक या भोंदूबाबाचा प्रचार करतात. मला त्याविषयी जास्त माहिती नव्हती म्हणून मी त्यावेळी तशी प्रतिक्रिया दिली. शेवटी आमच्यासाठी कार्यकर्त्यांना जपणे महत्त्वाचे असते, असे दत्तात्रय भरणे यांनी म्हटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशी मध्ये जे काही बाहेर येईल ते समजेल. जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, अशी भूमिका दत्तात्रय भरणे यांनी घेतली.


