
१५ ऑगस्टला भगवा ध्वज? सांगलीतील पदयात्रेवरून नवा वाद; संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
आज १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रे’वरून मोठा राजकीय वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संभाजी भिडे (मनोहर भिडे) यांच्या समर्थकांनी या पदयात्रेचे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

व्हायरल पोस्टरवरील ‘त्या’ विधानामुळे खळबळ

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून काढण्यात आलेल्या या पदयात्रेच्या पोस्टरवर अखंड हिंदुस्थानच्या संदर्भाने एक वक्तव्य करण्यात आले आहे.

पोस्टरवरील मजकूर
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून ‘अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज म्हणून परम पवित्र भगवाच असला पाहिजे’ हे जगाला ठणकावून सांगण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा.राष्ट्रध्वज तिरंग्याऐवजी ‘भगवा’ राष्ट्रध्वज असला पाहिजे, या आशयाच्या विधानामुळे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि संभाजी भिडे यांच्यावर टीकेची झोड उठू लागली आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांचा थेट सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा
या व्हायरल पोस्टरचा संदर्भ देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांनी सोशल मीडिया (X) वर पोस्ट करत राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मनोहर भिडे राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान करत आहेत. देशात ‘वंदे मातरम्’चा अपमान झाला तर शिक्षेची तरतूद आहे, मग राष्ट्रध्वजाचा असा अवमान कसा खपवून घेतला जाऊ शकतो?” असा तिखट सवाल त्यांनी केला. ज्यांनी सलग ५२ वर्षे आपल्या कार्यालयावर तिरंगा फडकावला नाही, त्यांना आता तिरंगा यात्रा काढावीशी वाटते. पण राष्ट्रध्वजाचा जाहीर अवमान करणाऱ्या भिडेंवर हे सरकार आणि मुख्यमंत्री गुन्हा दाखल करणार का? ही आमची थेट मागणी आहे,” असे सचिन सावंत यांनी स्पष्ट केले.
आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच तिरंग्याबाबत अशा प्रकारचे विधान समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी थेट कारवाईची मागणी लावून धरल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभाग यावर काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

