
महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या धडक आणि धडाकेबाज कारवायांमुळे सध्या राज्यभरात प्रचंड चर्चेत आहेत. मे २०२६ मध्ये एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी अन्नातील भेसळ आणि अस्वच्छतेविरोधात व्यापक मोहीम उघडली आहे. या मोहिमेचा धसका महाराष्ट्रातील बड्या रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि सरकारी संस्थांच्या कॅन्टीननेही घेतला आहे. दरम्यान, एका विशेष मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी भ्रष्टाचाऱ्यांना दिलेल्या थेट इशाऱ्याची सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

“मला लाच देण्याचे धाडस कोणीही करू शकत नाही!”

मुलाखतीदरम्यान स्वतःवर होणाऱ्या टीकेला आणि कारकिर्दीला उत्तर देताना तुकाराम मुंढे अत्यंत ठामपणे म्हणाले. “जर प्रत्येकाने आपली भूमिका प्रामाणिकपणे बजावली, तर आपण खऱ्या अर्थाने एक चांगला समाज बनू शकतो. माझे अनेक टीकाकार मला अहंकारी म्हणतात, पण मी फक्त माझी कर्तव्ये पार पाडत आहे. मला लाच देण्याचे धाडस कोणीही करणार नाही आणि कोणी करूही शकत नाही! जर कोणी असा विचारही करत असेल, तर त्यांनी असे करण्यापूर्वी १०० वेळा विचार करावा.आपल्या संपूर्ण सेवाकाळात प्रामाणिकपणा आणि नियमांचे काटेकोर पालन यालाच सर्वोच्च प्राधान्य दिल्याने भ्रष्टाचार करणारे लोक घाबरतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२० वर्षांत २५ बदल्या, पण राजकीय दबावाला कधीच बळी पडले नाहीत!
तुकाराम मुंढे हे देशातील सर्वात कडक, निष्पक्ष आणि प्रामाणिक आयएएस (IAS) अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात.आपल्या जवळपास २० वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तुकाराम मुंढे यांची २५ वेळा बदली झाली आहे.वारंवार बदल्या होऊनही त्यांनी कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबावाला कधीही बळी पडण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
नेटकरी आणि सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव
तुकाराम मुंढे जिथे जातात, तिथे कामाचा धडाका लावून प्रशासनाला शिस्त लावतात. सध्या त्यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, नागरिक आणि सेलिब्रिटीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करत “आमच्या भागात या आणि चुकीच्या गोष्टींवर कारवाई करा” अशी थेट विनंती त्यांना करत आहेत.अन्नसुरक्षेच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या बड्या ब्रँड्सचे पितळ उघडे पडत असल्याने जनतेचा तुकाराम मुंढेंवरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे.

