
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाश आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचल्याचे असल्याची चर्चा सुरू आहे. एसआयटीच्या चौकशीतही तसेच संकेत दिसू लागले आहेत. अशोक खरातचे संबंध राजकीय नेत्यांसोबत असल्याचा दावा केला जात आहे. त्याच्याकडे काही राजकीय मंडळींची रांग लागली असल्याचे सांगण्यात येते. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील ३९ आमदार खरातकडे येत असे म्हटले. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातच्या मुलीची लग्नपत्रिका समोर आली असून त्यात प्रमुख पाहुणे म्हणून बड्या नेत्यांची नावे आहेत.

अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील बड्या नेत्यांची नावे या भोंदूच्या ‘खास पाहुण्यांच्या’ यादीत असल्याचे उघड झाले आहे. तर, दुसरीकडे एसआयटीच्या तपासात खरातच्या मोबाईलमधील ‘क्लोन डेटा’ हाती आला आहे. त्यामुळे चौकशीच्या धास्तीने अनेक व्हीआयपी मंडळींचे धाबे दणाणले आहेत

अशोक खरातची मुलगी तृप्ताबाला हिच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार यांची नावे आहेत. त्याशिवाय, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर आणि मिलिंद नार्वेकर यांसारख्या नेत्यांची नावे ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून छापण्यात आली होती. नाशिकमध्ये झालेल्या या सोहळ्याला कोणी-कोणी हजेरी लावली याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


