
नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पहिल्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर, आज (२ एप्रिल) त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दरम्यान, एसआयटीच्या तपासात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक माहिती समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांचे संगनमत असल्याचे उघड झाले आहे. एसआयटीनं चौकशी केलेल्या एका डॉक्टरला राजकीय पाठबळ असल्याचे सांगण्यात येते. तर, आणखी एक डॉक्टर हा पंचवटीमधील बडा डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.

भोंदू खरात हा महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत असे. तुझ्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील,” असा मानसिक दबाव तो महिलांवर टाकत असे. दोष मोठा असल्याचे सांगून तो अनेकदा महिलांचे शोषण करत असे. धक्कादायक म्हणजे, पीडित महिला गर्भवती राहू नयेत यासाठी त्यांना गुपचूप गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जात होत्या.

एसआयटीने मागील काही दिवसात नाशिकमधील काही डॉक्टरांची कसून चौकशी केली. या चौकशीत काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्याची माहिती आहे. महिलांच्या लैंगिक शोषणात खरातला मदत करणाऱ्या दोन डॉक्टरांची नावे तपासाच्या कक्षेत आली आहेत. यातील एक डॉक्टर राजकीय पार्श्वभूमी असलेला, तर दुसरा पंचवटी परिसरातील नामांकित व्यावसायिक असल्याची चर्चा आहे. या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खरात महिलांना गुंगीची औषधे आणि गर्भपाताच्या गोळ्या पुरवत असल्याचा संशय आहे. लवकरच या पांढरपेशी गुन्हेगारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

