
अशोक खरातच्या अघोरी साम्राज्यामागचा असली मास्टरमाईंड सापडला
मोठ्या नेत्याचं नाव समोर येताच पोलीस अॅक्शन मोडमध्ये
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहे. अशोक खरातच्या विविध कृत्यांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत.

समता पतसंस्थेतील १०० खात्यांचा तपास सुरू असतानाच आता सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेचे संस्थापक नामकरण आवारे हे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आता आवारे यांच्याकडे वळवला असून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याने नामकरण आवारे यांच्या जगदंब पतसंस्थेचा वापर मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहारांसाठी केला होता. या एकाच पतसंस्थेत खरातची ३२ विविध खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासात या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची संशयास्पद देवाण-घेवाण झाल्याचे समोर आले आहे. ही रक्कम नेमकी कुठून आली आणि कुठे वळवण्यात आली, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. नामकरण आवारे हे खरातचे निकटवर्तीय मानले जातात. ते भाजपा आघाडीचे प्रमुख होते. त्यामुळे या व्यवहारांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता का, याची पडताळणी केली जात आहे.

अशोक खरातला समाजासमोर एक सिद्धपुरुष म्हणून मांडण्यात नामकरण आवारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. आवारे हे खरातचे कट्टर भक्त म्हणून ओळखले जात होते. खरातच्या भोंदूगिरीला पाठबळ देण्यासाठी आणि त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा आणि संस्थेचा वापर केल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे आता आवारे शिर्डी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

