
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटत असतानाच गेल्या वर्षी सोशल मीडियावर सतीश उर्फ खोक्या भोसले याचा एका व्यक्तीला बॅटीने अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

या प्रकरणात खोक्या भोसले याला अटक करण्यात आली. पुराव्याअभावी शिरुर कासार तालुक्यातील ठाकणे पिता पुत्र मारहाण प्रकरणातून निर्देाष त्याची निर्देाष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच वन्य प्राण्यांची शिकार करून हरणाचे मांस घरात आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

बीड न्यायालयात मारहाण प्रकरणाची सुनावणी पार पडली. न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सतीश उर्फ खोक्या भोसले याला मोठा दिलासा मिळाला आहे. तो काल संधाकाळी एका वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृहातून बाहेर आला आहे.

कारागृहातून बाहेर पडताच सतीश भोसलेने माध्यमांशी बोलताना आपली पहिली प्रतिक्रिया दिली. आज न्याय देवतेने मला न्याय दिला असून अखेर सत्याचा विजय झाला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात माझं सगळं काही उद्ध्वस्त झालं. एका मोठ्या नेत्याला राजकीयदृष्ट्या टार्गेट करण्यासाठी माझ्यासारख्या आदिवासी समाजातील तरुणाचा बळी दिला गेला, असा आरोप त्याने केला.
माझ्या कुटुंबावर तीन वेळा हल्ले झाले, पण प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतली नाही. आयुष्यभराच्या कमाईतून उभारलेलं माझं घरही पाडलं गेलं, असे सतीश भोसले म्हणाला.आमच्या जिल्ह्यात काही मोजके लोक राजकारणात जातीयवादाचे विष कालवण्याचे काम करत आहेत. बॅटने मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडीओचे सत्यही लवकरच समोर येईल. न्याय देवता त्या प्रकरणात जो काही निर्णय देईल, तो मला मान्य असेल.

