
बारामती पोट निवडणुकीच्या अनुषांगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

फोन करून सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची विनंती केली असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही पाठिंब्यासाठी सुनेत्रा पवार विनंती करणार असल्याची माहिती समोर आली आहे.तर बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आहे. सुनेत्रा पवार सोमवारी (6 एप्रिलला) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, मंत्री उपस्थित राहणार आहेत.

बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष आपला उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत, निवडणुकीसाठी काँग्रेसने काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्याची माहिती काल समोर आली होती. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतील इतर मित्र पक्षांशी देखील उमेदवारी बाबत चर्चा करत आहे, अशातच राष्ट्रवादी काँग्रेस कडून बारामती पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठीच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनेत्रा पवार यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीमध्ये आपल्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती आहे.

दरम्यान काँग्रेस पक्ष राहुरी आणि बारामती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहे, या दोन्ही मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याच्या हालचाली ही काँग्रेसने सुरू केल्या आहेत, अशातच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी देखील सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते त्यांना विनंती करणार आहेत, आणि आपल्या पक्षाला पाठिंबा द्यावा अशी मागणी करणार आहेत पण काँग्रेस पक्ष या संदर्भात काय भूमिका घेते हेही महत्त्वाचं ठरणार आहे, दरम्यान सुनेत्रा पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी विनंती केल्यानंतर उद्धव ठाकरेंची भूमिका काय असणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही पोट निवडणूक बिनविरोध हवी त्यासाठी प्रयत्न करत आहेत.

